राज्यात बर्ड फ्लूने डोकं वर काढलं आहे. काही वर्षांपूर्वी बर्ड फ्लूमुळे खवय्यांचे चांगलेच वांधे झाले होते. तर कुक्कुटपालन व्यावसायिकांना मोठा आर्थिक फटका बसला होता. आता ही राज्यातील लातूरसह ठाणे आणि इतर जिल्ह्यात पोल्ट्री फार्म चालक आणि मालकांची चिंता वाढली आहे. तर अनेक हॉटेल्सवर आतापासूनच चिकन नको, अशी आरोळी ग्राहक ठोकत आहेत. त्यामुळे हॉटेल व्यावसायिक आणि पोल्ट्री उद्योग आव्हानांना सामोरं जात आहे.
लातूरमध्ये 4200 पिल्लं दगावली
राज्यात बर्ड फ्लूचा कहर वाढत आहे. लातूर जिल्ह्यातील एका पोल्ट्री फॉर्मवरील 4200 पिल्लं अचानक दगावली आहेत. त्यामुळे प्रशासन खडबडून जागं झालं आहे. दोन ते तीन दिवसातच पिल्ल दगावण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. सुरूवातीला काय प्रकार होत आहे, हे मालकाला कळेना, त्यानंतर प्रशासनाने या पिल्लांचे सॅम्पल पुणे येथील प्राण्यांशी संबंधित प्रयोगशाळेकडे पाठवले. पिल्लं नेमकी कशामुळे दगावली याची चौकशी आणि तपास करण्यात येत आहे.
हे सुद्धा वाचा
कावळ्यांना सुद्धा सोडलं नाही
लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील ढालेगाव येथील पोल्ट्री फॉर्ममध्ये कोंबडीची पिल्लं दगावली. तर दुसरीकडे उदगीर शहरात 60 कावळ्यांचा मृत्यूची घटना घडली. बर्ड फ्लूमुळेच कावळ्यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या घटनेने जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे. मृत पिल्लाचे नमुने आता वैद्यकीय प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहे.
ठाण्यात बर्ड फ्लू चा शिरकाव
ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या बारा बंगला परिसरातील सरकारी निवासस्थानात पाळलेल्या कोंबड्यांना बर्ड फ्लूची लागण झाल्याचे उघड झाले. त्यामुळे ठाणे पालिकेने कोपरी परिसरात ५ फेब्रुवारीपर्यंत मांसाहार विक्रीची दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. बर्ड फ्लूचा संसर्ग रोखण्यासाठी पालिकेने जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार उपाययोजना केली आहे.
डुंबरे यांच्या सरकारी निवासस्थानात पाळलेल्या कोंबड्यांना बर्ड फ्लूची लागण झाल्याचे मागील आठवड्यात समोर आले होते. यानंतर जिल्हा पशुसंवर्धन विभागाने बंगल्याच्या एक किलोमीटर परिसरातील सर्व कोंबड्या नष्ट करण्याचे काम केले होते. बर्ड फ्लूचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कृती आराखड्यानुसार उपाययोजना करण्यास सुरुवात केली होती.
Web Title – चिकनवर मारताय ताव? मग ही बातमी वाचली का? बर्ड फ्लू पसरतोय हातपाय, इतक्या पिलांचा तुमच्या अगोदर घेतलाय बळी – Marathi News | Bird Flue in Maharashtra Poultry Farm, 4200 Chicks Die in Latur, State Authorities Initiate Investigation