कृषिपंपांना 12 तास वीजपुरवठा करण्याची घोषणा फोल ठरत असून रात्री होणाऱ्या वीज पुरवठ्याने भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातील भाजीपाला उत्पादक शेतकरी त्रस्त झाले आहेत.

Image Credit source: tv9marathi
शाहिद पठाण, गोंदिया : धान्य उत्पादक शेतकऱ्यांना (FARMER) हेक्टरी पंधरा हजार रुपये बोनस देण्याची घोषणा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM EKNATH SHINDE) यांनी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात (Winter session) केली होती. त्या घोषणेला दोन महिन्यांचा कालावधी लोटला तरी यासंदर्भातील जीआर अद्याप निघालेला नाही. तर महिनाभरापासून धानाचे 600 कोटी रुपयांचे चुकारे थकल्याने शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. ना बोनस, ना चुकारे केवळ आश्वासनाचे पोवाडे असं चित्र पाहायला मिळत आहे. शासकीय धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान म्हणून शासनाकडून प्रतिक्विंटल बोनस दिला जातो. मात्र यावर्षी राज्य सरकारने धानाला प्रतिक्विंटल बोनसऐवजी हेक्टरी 15 हजार रुपये बोनसची घोषणा केली.
शासनाने दोन हेक्टरपर्यंतची मर्यादा निश्चित केली. ही घोषणा करून आता दोन महिन्यांचा कालावधी लोटला पण अद्यापही यासंदर्भात जीआर काढलेला नाही. त्यामुळे अद्यापही बोनस जमा करण्याची अथवा बोनससाठी पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांची संख्यासुद्धा निश्चित करण्यात आली नाही. त्यामुळे पूर्व विदर्भातील पाच त सहा लाखांवर शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला असून बोनसची घोषणा पोकळ आश्वासन ठरणार नाही ना अशी शंका आता शेतकरी घेऊ लागले आहेत.
मालेगाव जनावरांचेही केले जातेय थंडीपासून संरक्षण
मालेगावमधील ग्रामीण भागात सध्या थंडीचा कडाका जाणवत असून नाशिकच्या चांदवड येथील बैलांची खरेदी विक्री करणाऱ्या एका मध्यप्रदेशातील व्यापाऱ्याने बैलांना थंडी वाजू नये म्हणून प्रत्येक बैलाच्या अंगावर ‘बारदान’ टाकत थंडीपासून बचाव करण्याचा प्रयत्न केला आहे. भगवान राठोड असे या व्यापाऱ्याचे नाव असून सायंकाळी बैलांना चारापाणी केल्या नंतर प्रत्येक बैलाच्या अंगावर थंडी वाजू नये म्हणून बारदान टाकत बैलांचा थंडीपासून बचाव करण्याचा प्रयत्न करत आहे. राठोड यांच्याकडे तब्बल 50 बैलांची संख्या असून याकामी त्यांचे कुटुंबीय देखील त्यांना मदत करतात.
रात्रीच्या वीज पुरवठ्याने तुमसर तालुक्यातिल शेतकरी त्रस्त
कृषिपंपांना 12 तास वीजपुरवठा करण्याची घोषणा फोल ठरत असून रात्री होणाऱ्या वीज पुरवठ्याने भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातील भाजीपाला उत्पादक शेतकरी त्रस्त झाले आहेत. सोरणा, लंजेरा, पिटेसूर, लोहारा आदी गावांमध्ये मोठ्या प्रमाणात भाजीपाला लागवड केली जाते. परंतु 1 फेब्रुवारीपासून रात्री वीजपुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. मात्र, परिसरात वाघाचा संचार असल्याने रात्री शेतात जाणे धोकादायक आहे. भाजीपाला पिकाचे सिंचन कसे करावे, असा प्रश्न आहे.
Web Title – Agriculture news : मुख्यमंत्र्यांची घोषणा पोकळ ठरणार का ?, दोन महिने उलटूनही जीआर नाही – Government’s big announcement for farmers, even after two months there is no government order
